(प्रतिनिधी अशोक कुंभार)
सेवाभावी संस्थांचा पुढाकार, हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदी परिसरात विशेष स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. इंद्रायणी नदी पात्रातील वाढते प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सेवाभावी संस्था, साधक आणि भाविकांनी एकत्र येत नदी स्वच्छतेचा संकल्प केला.
नाणिज येथील मठाचे सद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या भक्त, शिष्य परिवार आणि संप्रदायाच्या पुढाकारातून हे भव्य दिव्य अभियान पार पडले. धार्मिक अधिक मास पर्वणीत आयोजित या सेवाकार्यात राज्यभरातील हजारो साधक सहभागी झाले होते.
स्वच्छता मोहिमेची सुरुवात माऊलींच्या प्रतिमेचे पूजन आणि नदी पूजनाने करण्यात आली. त्यानंतर साधकांनी नदी पात्रात उतरून कचरा, कपडे, जलपर्णी, लाकडी वस्तू, काचा, निर्माल्य, झाडे-झुडपे तसेच पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या वस्तू बाहेर काढल्या. अस्थी विसर्जनानंतर नदीत सोडण्यात आलेल्या वस्तूंचीदेखील विल्हेवाट लावण्यात आली. संकलित कचरा पुढील प्रक्रियेसाठी नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आला.
या अभियानात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतून चार हजारांहून अधिक भाविक आणि संग्राम सैनिक सहभागी झाले होते. महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. सेवाकार्यातून समाधान आणि आनंद मिळाल्याची भावना अनेक सेवकांनी व्यक्त केली.
स्वच्छता मोहिमेचे कौतुक करताना महापौर रवी लांडगे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, संस्थानचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे कबीर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तसेच नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
अखिल भारतीय संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर, सिद्धेश्वर कोळी आणि पश्चिम महाराष्ट्र लेफ्टनंट जनरल गणेश सस्ते यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आळंदी जनहित फाऊंडेशन यांच्या वतीने सर्व सेवकांचे आभार मानण्यात आले. तसेच आळंदी नगरपरिषदेने आरोग्य विभागाची यांत्रिक साधने उपलब्ध करून मोहिमेत सहकार्य केले.
संध्याकाळी इंद्रायणी नदी घाटावर दीपदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने नदी परिसर उजळून निघाला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























