कात्रज (प्रतिनिधी अशोक कुंभार)
काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख यांच्या बहुचर्चित आत्मचरित्र ‘शिदोरी’ या साहित्यकृतीला लातूर येथील ‘वनाई मातोश्री नवसंजीवन राज्यस्तरीय साहित्यकृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा नुकताच कात्रज येथील सुखसागर सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून साई हॉस्पिटलचे संचालक सुनील जगताप उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “अशा साहित्यकृती समाजाचा आरसाच असतात. पुण्यातील साहित्यिकाचा झालेला हा सन्मान आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.” तसेच त्यांनी अखंडित कल्याणकारी समूह, लातूर यांचे साहित्यसेवेसाठी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात ‘गोंडर’ कादंबरीवर भाष्य करण्यात आले. यावेळी अशोक कुबडे, कल्याण राऊत तसेच पुरस्कारार्थी कवी विलास बाबर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उमाकांत आदमाने यांनी केले, तर राजयुवाचे प्रकाशक गौरव पुंडे यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रा. शरदचंद्र काकडे यांच्या ‘शिदोरी’ या आत्मचरित्राला मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























