पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार
‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश देत पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. जगातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती घुमटाच्या साक्षीने आयोजित सामूहिक योगाभ्यासात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमात उपस्थितांनी ‘निरोगी जीवनासाठी दररोज योग’ करण्याचा संकल्प केला. विज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम घडविणाऱ्या विश्वशांती घुमटाच्या पवित्र वातावरणात झालेल्या या योगोत्सवाने सर्वांनाच आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, आंतरराष्ट्रीय नॅचरोपॅथी संघटना, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, सूर्या फाउंडेशन आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. मोहित दुबे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, कॅम्पस संचालक दिलीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अतुल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यापीठातील नियमित आरोग्य सराव उपक्रमांचा व्हिडिओ अहवाल सादर करण्यात आला. तसेच विशेष **‘योग पुस्तिका’**चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली असल्याचे सांगितले. तर कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ हा संदेश तरुण पिढीने आजपासूनच आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
मुख्य सत्रात योग तज्ज्ञांनी कॉमन योग प्रोटोकॉल (CYP) नुसार विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांकडून प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेतला. राष्ट्रगीताने या प्रेरणादायी आणि यशस्वी योगोत्सवाची सांगता झाली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























