मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार
आज (दि. 21 जून 2026) न्यू इंग्लिश स्कूल, पांगारे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
सकाळी 8 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक योगाभ्यासाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री. गोरक्ष भोसले यांनी योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पद्मासन यांसह विविध योगासनांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. तसेच प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता व मानसिक स्थैर्य कसे वाढवता येते, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी ह.भ.प. श्री. स्वप्निल काळाने महाराज यांनी विद्यार्थ्यांना योगदिनाच्या शुभेच्छा देत योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. रामराजे काकडे यांनीही विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिस्त विशेष लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दैनंदिन जीवनात नियमित योगासने करण्याचा संकल्प केला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























