| प्रतिनिधी अशोक कुंभार
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर परिसरात सुरू असलेल्या सभामंडपाच्या बांधकामादरम्यान अचानक मंडप कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली.
घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मंडपाच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ३० ते ४० भाविक अडकले, त्यापैकी ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनास्थळी लक्ष ठेवून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.:
अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत प्रशासनाकडून येणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्या.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम




















