आळंदी : प्रतिनिधी रोहिदास कदम
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा २०२६ यंदा पुण्यात ९ व १० जुलै २०२६ रोजी सलग दोन दिवस मुक्कामी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरालगत तसेच समोरील बाजूच्या मिळकती जागा ताब्यात घेण्यात आल्या असून, त्यामुळे यंदा श्रींच्या पालखी मुक्कामासाठी सुमारे ८ हजार चौरस फूट प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा) यांनी दिली.
या विस्तारित जागेमुळे वारकऱ्यांसह भाविकांना विविध सेवा-सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देता येणार आहेत. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी, वाहतूक आणि इतर गैरसोयी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजनाथ गुरु शांतीनाथ यांनी सांगितले की, या नव्या व्यवस्थेमुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणारे लाखो भाविक तसेच पुणेकर नागरिक यांना अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित वातावरणात सेवा-सुविधांचा लाभ घेता येईल. त्यामुळे पालखी मुक्काम अधिक नियोजनबद्ध आणि सुसज्ज पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे.
यंदाच्या आषाढी वारीत पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























