आळंदी इंद्रायणी नदी घाटावर छठ पूजा जल्लोषात
हजारो भाविकांची साक्ष, वरुणराजाचीही साथ; फटाक्यांची आतिषबाजी झगमगली
आळंदी (रवि कदम) :
पवित्र इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय बांधवांसह महाराष्ट्रात स्थायिक नागरिकांनी पारंपरिक रीतीरिवाजांनी ‘महाछठ’ पर्व उत्साहात साजरे केले. घाट परिसरावर हजारो भाविकांची उसळलेली गर्दी, नदीत उतरून करण्यात आलेली पूजा-अर्चा, फटाक्यांची आतिषबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण दिव्य झाले. वरुणराजाने हलकासा पाऊस टाकत या श्रद्धोत्सवास नैसर्गिक स्पर्श दिला तरी भक्तिभावाची ज्योत मंदावली नाही.
या धार्मिक सोहळ्यात नारीरत्न डॉ. सुनीता पाटेसकर यांचा त्यांच्या सामाजिक सेवेसाठी सन्मान करण्यात आला.
मान्यवरांची गौरवपूर्ण उपस्थिती
कार्यक्रमाला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले पाटील, श्रीराम ट्रस्ट विश्वस्त मंदिर अर्जुन मेदनकर, मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक सुधीर मुंगसे, माजी सरपंच अमोल वीरकर, दिलीप मुंगसे, उमेश बिडकर, उद्योजक सुरेश दौडकर, काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, विनोदकुमार मिश्रा, राकेश महतो, श्रीनिवास मिश्रा, राजेश यादव, तसेच जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समिती आळंदीचे संयोजक डॉ. अन्नू भारद्वाज, सुधीरकुमार शर्मा, कृष्णा भारद्वाज, अर्विंद सिंग यांसह मान्यवर उपस्थित होते.
भक्तीचा दीपोत्सव
इंद्रायणी नदीत उतरून अर्घ्य अर्पण, दीपदान, आरती, व्रत साधना या सर्व धार्मिक विधींचे आयोजन भक्तिमय वातावरणात पार पडले. तीन दिवस निर्जल उपवास करणाऱ्या व्रतस्त्रियांचा उत्साह दांडगा होता. मावळत्या आणि उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पूजेस सांगता झाली.
सेवाभावही ठळक
आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्री सत्य साई सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले. पाणी वाटप, महाप्रसाद, अन्नदान, स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सुधीरकुमार शर्मा यांनी सांगितले.
प्रशासनाचा चोख बंदोबस्त
आळंदी व दिघी पोलीस ठाण्यांच्या वतीने पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेची काळजी घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके व पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी सुनियोजित कामकाज पाहिले.
विश्व श्रीराम सेनेतर्फे ‘भव्य काशी गंगा आरती’
मोशी येथील इंद्रायणी तीरावर भव्य गंगा आरती पार पडली. काशीहून आलेल्या पूजारी वर्गाने सादर केलेल्या या आरतीमुळे घाट परिसर मंत्रमुग्ध झाला.
श्रद्धा, त्याग आणि पर्यावरण संकल्प
छठ पूजा व्रताने आस्था, प्रेम, पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. सूर्यदेव उपासनेतून सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आजही दृढ आहे. सर्व धार्मिक व सामाजिक आयोजन जगतगुरू शंकराचार्य समिती व छठ महापूजा समितीच्या वतीने उद्योजक सुधीरकुमार शर्मा, संयोजक डॉ. अन्नू भारद्वाज, कृष्णा भारद्वाज, विनोद मिश्रा, राकेशकुमार महतो, राजेश यादव यांनी परिश्रमपूर्वक केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























