आळंदी (रविदास कदम )) : आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान (ट्रस्ट) तर्फे प्राचीन परंपरेचे जतन करत श्री रामनवमी निमित्त १८६ व्या वर्षातील श्री रामजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुढी पाडव्यापासून ते श्री रामनवमीपर्यंत, गुरुवार दि. १९ मार्च ते गुरुवार दि. २६ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात दररोज श्री राम मंदिरात रुद्राभिषेक, नारदीय कीर्तन, भजन, संकीर्तन, भक्ती संगीत, भरतनाट्यम, रामलीला तसेच आळंदीकर ग्रामस्थांच्या भजन सेवांचा समावेश आहे.
यावर्षीचा सोहळा अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून, भक्तांना आध्यात्मिक समाधान आणि सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव देण्याचा संस्थानचा उद्देश आहे.
सोहळ्याचा समारोप दि. २६ मार्च २०२६ रोजी श्री राम जन्म कीर्तन आणि श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा मिरवणुकीने करण्यात येणार आहे. 
या धार्मिक उत्सवात मोठ्या संख्येने भाविक व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आवेकर भावे रामचंद्र संस्थान (ट्रस्ट) व पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















