( प्रतिनिधी माऊली घुंडरे.) शेतकऱ्याला न विचारता महावितरणकडून विद्युत पोल उभारणीचा प्रयत्न? शेतकऱ्याचा तीव्र विरोध
गट क्रमांक ४७ मधील शेतजमिनीत परवानगीशिवाय खड्डे खोदण्याचा आरोप; काम तात्काळ थांबविण्याची मागणी
खेड तालुक्यातील मरकळ येथील शेतकरी सुरेश आनंदराव लोखंडे यांनी महावितरण विभागाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. पिंपळगाव तर्फे चाकण येथील गट क्रमांक ४७ मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विद्युत खांब उभारण्यासाठी खड्डे खोदण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शेतकऱ्याने शाखा अभियंता, महावितरण (एमएसईडीसीएल), आळंदी यांना लेखी अर्ज देत या कामास तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतजमिनीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने संबंधित काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
अर्जानुसार, संबंधित जागेच्या हक्काबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, उच्च न्यायालयातही याचिका प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोणतेही काम करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याची संमती घेणे आवश्यक असताना ती घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, यापूर्वी ज्या ठिकाणी विद्युत तारा टाकण्यात आल्या होत्या, त्याच मार्गाचा वापर करावा आणि नव्याने शेतजमिनीत खांब उभारू नयेत, अशीही मागणी अर्जात करण्यात आली आहे. भविष्यात या कामामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण विभागाची राहील, असा इशाराही शेतकऱ्याने दिला आहे.
या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित विभागाने याबाबत काय भूमिका घेतली, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टीप: ही बातमी उपलब्ध अर्जातील आरोपांवर आधारित आहे. महावितरण विभागाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. ती मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























