,(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी सचिन शिंदे)
पुणे : पुणे जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघ यांचे संयुक्त अधिवेशन पत्रकार भवन, पुणे येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. अधिवेशनाच्या प्रारंभी श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी नामस्मरण व भजन सादर करून उपस्थित ग्रंथालय प्रेमींना मंत्रमुग्ध केले. परंपरेप्रमाणे वारकरी दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांनी केले.
अध्यक्ष योगेश सोमन यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालय आणि साहित्य परिषद यांचे निकटचे नाते अधोरेखित करत ग्रंथपालांना न्याय मिळावा, ग्रंथालयांचा विकास व्हावा व वाचन चळवळ टिकून राहावी यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांनी ग्रंथालयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करत ग्रंथपालांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर चिंता व्यक्त केली. अनेक ग्रंथपालांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच मोहन महाराज शिंदे यांनी शासनाकडून ग्रंथालयांना मिळणारे अपुरे अनुदान, जागेची अडचण, कर्मचारी पगार, वीज बिल अशा समस्यांमुळे अनेक ग्रंथालये बंद पडण्याच्या अवस्थेत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात बांधण्यात येणारी समाजमंदिरे ग्रंथालयांना नाममात्र भाड्याने उपलब्ध करून दिल्यास वाचन चळवळीला मोठी चालना मिळू शकते, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमास श्रेया गोखले (ग्रंथालय अधिकारी), कुणाल टिळक (नगरसेवक), चंद्रशेखर कपोते, राजू घाटोळे, राजेंद्र ढमाले, रमेश सुतार, अरुण दांगट, हनुमंत देवकर, रजनी पाचंगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनात ग्रंथालयांच्या समस्या, वाचन संस्कृती टिकवण्याची गरज आणि शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























