आळंदी / मानवमित्र न्यूज प्रतिनिधी संदीप मुंगसे
आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोतील गंभीर अनागोंदीमुळे केळगाव-सरली परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि मुक्या जनावरांवर मोठे संकट ओढवले आहे. डेपोमध्ये कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याने आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि प्रदूषणाने कहर केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शहरातील कचरा वाहून आणणाऱ्या गाड्यांमधून रस्त्यावर सांडणारा कचरा खात-खात जनावरे थेट डेपोपर्यंत पोहोचतात. डेपोला संरक्षक कंपाऊंड नसल्यामुळे ही जनावरे आत शिरून अडकतात. अनेक जनावरांचा जीव धोक्यात येत असून, मुक्या प्राण्यांच्या जीविताची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे डेपोमध्ये कचऱ्यावर कोणतीही शास्त्रोक्त प्रक्रिया होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वॉचमनची व्यवस्था नसल्याने डेपो बेवारस अवस्थेत आहे. डेपोमधून वाहणारे सांडपाणी, घाण आणि कचऱ्यामुळे आजूबाजूच्या शेतजमिनी प्रदूषित होत असून, दुर्गंधी आणि माशा-डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने डेपोला संरक्षक भिंत उभारणे, सुरक्षा व्यवस्था करणे, कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा केळगाव व चऱ्होली(खु)परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























