बातमी प्रतिनिधी अशोक कुंभार
पांगरे : पुरंदरच्या पायथ्याशी वसलेल्या पांगरे गावात ह.भ.प. वैकुंठवासी रामचंद्र अर्जुन काकडे देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला तुकाराम महाराज गाथा पारायण व संगीतमय भागवत कथा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.
गावातील सुपुत्र श्री. संतोष रामचंद्र काकडे यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 6 ते 10 या वेळेत संगीतमय भागवत कथेला प्रारंभ झाला.
या भागवत कथेचे निरूपण ह.भ.प. श्री. संतोष महाराज पायगुडे यांनी अतिशय सोप्या, गोड व मधुर भाषेत केले. त्यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. संगीतमय स्वरूपातील कथा ऐकत भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते.
गाथा व्यासपीठाचे संचालन ह.भ.प. प्रशांत महाराज पुरंदरे तसेच मंगेश महाराज चौधरी (चौधरवाडी) यांनी केले. संगीतबद्ध गाथा वाचनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ. वंदना नंदकुमार निगडे, सौ. छाया निगडे आणि सौ. माया इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी या सप्ताहाचा समारोह संपन्न झाला. तुकाराम गाथा व भागवत कथेच्या समारोपानिमित्त काल्याचे कीर्तन ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रामराजे कृष्णराव काकडे, श्री. प्रकाश राजाराम काकडे आणि श्री. जयेश पार्थ हनुमंत काकडे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाला गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिरसाचा आनंद लुटत होते. पांगरे गावातील हा धार्मिक सोहळा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण ठरला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























