(आळंदी रविदास कदम): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १९ फेब्रुवारी) आळंदी तसेच पंचक्रोशी परिसरात मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांनी शिवरायांना अभिवादन केले. . 
यावेळी शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथांवर आधारित गाणी, पोवाडे आणि संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या. युवकांनी तुतारीच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने जल्लोष साजरा केला.
आळंदी येथील शॉपिंग परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. तसेच संगीतमय कवायत, संचलन आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांमुळे परिसर पूर्णपणे शिवमय झाला होता.
भाविकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला.
🟠 “शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकार्याची दिशा मिळते,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























