पुणे | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र आणि साल्हेरच्या रणांगणातील पराक्रमी सरदार वीर सूर्यराव काकडे यांच्या शौर्यगाथेला कवितांच्या माध्यमातून जनमानसात पोहोचविणाऱ्या “वीर सरदार” या शंभर कवींच्या शंभर कवितांच्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन पुण्यातील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रसंगी प्रकाशक प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख यांनी सांगितले की, महापराक्रमी सरदार सूर्यराव काकडे यांचा इतिहास अनेक वर्षे दुर्लक्षित राहिला आहे. त्यांच्या पराक्रमाची गाथा वीररसपूर्ण कवितांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या काव्यसंग्रहामागील मुख्य उद्देश आहे.
प्रकाशन सोहळ्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मावळा आणि रणरागिणी पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख यांच्या “तुळस” तसेच कवी विलास बाबर यांच्या “वर्षास्पर्श” या काव्यसंग्रहांचेही प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची विशेष उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी इतिहासप्रेमी भालचंद्र खरळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक सुधीरभाऊ कोंढरे, कल्याण राऊत, माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, रत्नाकर शेळके तसेच स्वागताध्यक्ष विलास बाबर उपस्थित होते.
याशिवाय मालिका व चित्रपट अभिनेते शरद घारे, रानकवी लक्षण जाधव आणि कविसंमेलनाचे अध्यक्ष रविंद्र काकडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैल सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शन गौरव पुंडे यांनी केले.
सूर्यराव काकडे यांच्या शौर्यगाथेला साहित्यिक अभिव्यक्तीतून नवा आयाम देणारा हा सोहळा उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























