,(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुणे : प्रत्येक सरकारी योजनेमागील हेतू विधायक असला तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे अनेक योजना जनसामान्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे ‘विकसित भारत’ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्व भारतीयांची सामूहिक जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत माजी खासदार आणि पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
त्या एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ‘विकसित भारत @2047 : सबलीकृत नागरिक, सक्षम धोरणे आणि मजबूत संस्था’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या. या परिषदेचे आयोजन एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस तर्फे भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
चव्हाण यांनी सांगितले की, विकसित भारत घडविताना पर्यावरणीय शाश्वतता, शाश्वत शहरी नियोजन आणि जबाबदार पायाभूत सुविधा यांचा समन्वय आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक सुविधा उभारल्यानंतर त्या तात्काळ नागरिकांसाठी कार्यान्वित होणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेत सार्वजनिक धोरण, सुशासन, भारतीय ज्ञानपरंपरा आणि परराष्ट्र धोरण या विषयांवर संशोधनपर लेख सादर करण्यात आले. देशभरातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि धोरणतज्ज्ञांनी सहभाग नोंदवून २०४७ पर्यंत विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
या कार्यक्रमास एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., डेक्कन इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे उपसंचालक प्रा. डॉ. अल्विटे निंगथौजाम, प्रॉव्होस्ट डॉ. सायली गणकर, एमआयटी-एसआयसीएसचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे आणि परिषदेचे समन्वयक डॉ. विकास कोळेकर उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























