तीर्थपुरी ( प्रतिनिधी :राहुल बोबडे) तीर्थपुरी परिसरात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे आणि ऊस बिल रखडल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मटका, जुगार, अवैध वाळू उपसा यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडून रखडलेले ऊस बिल त्वरित अदा न केल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल ज्ञानदेव बोबडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, तीर्थपुरी परिसरात खुलेआम ऑनलाईन मटका, जुगार आणि अवैध वाळू उपसा सुरू असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दुसरीकडे, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने अंबड व धनसावंगी तालुक्यातील सुमारे ५०० शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेतला. मात्र दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांना ऊस बिल मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून बियाणे, खते व मशागतीसाठी पैशांची गरज असताना कारखाना प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अनेक वेळा पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. रखडलेले ऊस बिल तात्काळ जमा करावे तसेच अवैध धंदे कायमचे बंद करावेत, अन्यथा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर आणि प्रशासनाविरोधात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























