तीर्थपुरी | प्रतिनिधी राहुल बोबडे
तीर्थपुरी शहरात बुधवारी दुपारच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक कारवाई करत भीलवाडा परिसरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानाची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पथकाने खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून गोदामाला सील लावल्याचे सांगितले जात आहे.
या कारवाईदरम्यान स्थानिक पोलीस प्रशासन, प्रिंट मीडिया तसेच डिजिटल मीडिया प्रतिनिधींना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा दावा काही पत्रकारांनी केला आहे. तसेच कारवाईनंतरही अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध न झाल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक पत्रकार व नागरिकांनी संबंधित विभागाकडे कारवाईबाबत सविस्तर माहिती, तपासणीचे कारण, नमुने घेण्यामागील उद्देश आणि पुढील कार्यवाही याबाबत अधिकृत प्रेस नोट जाहीर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अधिकृत अहवाल आणि विभागीय खुलाशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– मानव मित्र NEWS
राहुल बोबडे | प्रतिनिधी, धनसांगवी

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























