आळंदी देवाची रवीदास कदम
तीर्थक्षेत्र आळंदी हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन समाधीमुळे संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र सध्या आळंदी शहरात सुरू असलेल्या कामांमुळे आळंदीच्या पावित्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरभर विकासकामांच्या नावाखाली धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिक, भाविक व वारकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यांवर पाणी न मारणे, मलबा उघड्यावर ठेवणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यामुळे “स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी, हरित आळंदी” ही संकल्पना केवळ घोषणापुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, कुंडलिकेच्या मंदिर परिसरात देवस्थान व इतर गटारांचे सांडपाणी एकमेकात मिसळून थेट नदी पात्रात जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या अत्यंत संवेदनशील व पवित्र परिसरात अशी अवस्था असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, नदी पात्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेली कामे त्वरित बंद करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. या कामांमधून निघालेली माती थेट नदी पात्रातच साचवण्यात आली असून त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत आहे. पर्यावरणाचे नुकसान होण्यासोबतच भविष्यात पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदारास तात्काळ नोटीस देऊन ब्लॅकलिस्ट करावे, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व भाविकांकडून होत आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























