आळंदी, दि. २५ (वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित करण्यात आलेला बाल हक्क संवेदनशीलता आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती वंदना जैन (अवर सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग), प्रशांत पोपट कुऱ्हाडे (नगराध्यक्ष), सुजाता तापकीर (उपनगराध्यक्षा), माधव खांडेकर (मुख्याधिकारी), संतोष शिंदे (माजी सदस्य), डॉ. आश्विनी गेतें (मनमुक्ता फाउंडेशन), भिमा नरके (पोलीस निरीक्षक), सोनाली झिंजुर्डे (प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग) तसेच आळंदी नगरपरिषद येथील सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रास्ताविक करताना बाल हक्क संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश बहिरट आणि दत्तात्रय ढेंगळे यांनी उत्कृष्टरीत्या केले. पुनम गायकवाड आणि मुस्कान फाउंडेशनच्या टीमने प्रभावी पथनाट्याद्वारे बाल हक्कांविषयी जनजागृती केली. उस
कार्यक्रमादरम्यान श्रीमती वंदना जैन यांनी बाल हक्क संरक्षणाबाबत जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट केले. नगराध्यक्ष प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी आयोगाचे आभार मानून अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बाल हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. आश्विनी गेतें यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता वाढवली, तर पुनम गायकवाड यांनी ‘गुड टच-बॅड टच’ या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन वैशाली पाटील, अर्जुन घोडे, शशांक कदम, महेश घुंडरे, शशिकांत चव्हाण, शुभम कुऱ्हाडे, उद्धव मते, योगिता कुऱ्हाडे आणि जयश्री वाळुंज यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूजा घुंडरे यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये बाल हक्कांविषयी जागरूकता निर्माण होऊन संवेदनशीलता वाढेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























