- महिला कामगाराच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
पुणे, प्रतिनिधी: अशोक कुंभार
के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई महिला कामगार स्वाती अण्णा देडे यांच्या मृत्यूप्रकरणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनतर्फे तीव्र आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन येत्या सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी के.ई.एम. हॉस्पिटल, पुणे येथे होणार आहे.
युनियनचे सरचिटणीस मा. चंद्रकांत सुदाम कांबळे यांनी सांगितले की, “स्वाती देडे यांच्या मृत्यूसाठी हॉस्पिटल प्रशासन, ठेकेदार सुनील पारखे व तसेच मयत महिलेवर उशिरा उपचार करणाऱ्या डॉ सो लोखंडे यांची निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा,” अशी आमची मागणी आहे.
कांबळे यांनी पुढे सांगितले की, हॉस्पिटलमधील ठेकेदारी पद्धतीमुळे अनेक महिला कामगार असुरक्षित वातावरणात काम करत आहेत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
मृत महिला कामगार स्वाती देडे यांच्या पतीला के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च हॉस्पिटल प्रशासनाने उचलावा.
मुलगा अनिरुद्ध देडे यांच्या भविष्यत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलने सर्व वैद्यकीय साहाय्य करावे.
संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांचा करार रद्द करण्यात यावा.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























