पुणे वार्ताहार रवि कदम
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खेड तालुक्यातील राजकारणाला वेग आला आहे. पिंपळगाव तर्फे खेड गट सर्वसाधारण ठेवण्यात आला असून, या गटातून सभापती विजयसिंह शिंदे निवडणूक लढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रेटवडी–वाफगाव गट हा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने, या गटातून सौ. गौरीताई विजय शिंदे यांना उमेदवार म्हणून उभे करणार का, यावरही चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही गट निवडणुकीसाठी सोयीचे मानले जात असून, निवडणुकीचे संकेत मिळताच शिंदे दाम्पत्यांनी दोन्ही गटांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
गौरीताई शिंदे यांनी नवरात्रोत्सव, महिला बचत गट, तसेच विविध मंडळांच्या माध्यमातून महिलांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. शिंदे परिवाराचे नातेवाईक आणि समर्थक या दोन्ही गटांत मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक आहे.
विजयसिंह शिंदे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांशी थेट संवाद, आपुलकीचे बोलणे आणि सहकार्यशील स्वभाव यामुळे ते शेतकरी वर्गात लोकप्रिय आहेत.
जाणकारांच्या मते, त्यांच्या विरोधात कोण उमेदवार उभा राहतो हे गौण असून, विजयसिंह शिंदे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी दोन नंबरच्या मताधिक्याने विजय मिळवला होता, हेही सर्वांना लक्षात आहे.
सुख-दुःखात नेहमी लोकांच्या पाठीशी उभे राहणारे विजयसिंह शिंदे हे आज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह नाव ठरले आहे

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























