नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगात येणार; नगराध्यक्ष पद खुलं, प्रभाग आरक्षण जाहीर
आळंदी (प्रतिनिधी : रवी कदम)
आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची आरक्षणे अखेर जाहीर झाली असून, यामुळे शहरात चुरशीच्या लढती होण्याचे संकेत मिळत आहेत. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर नागरिकांना आपल्या हक्काचे प्रतिनिधी मिळण्याची उत्सुकता असून, इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढली आहे.
लांबलेली निवडणूक प्रक्रिया आता मार्गी
गेल्या चार वर्षांपासून रखडलेली निवडणूक प्रक्रिया अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार पुणे जिल्हा प्रशासनाने आळंदी नगरपरिषदेसह काही नगरपरिषदेच्या निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले असून, त्यासोबतच प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.
प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
आळंदी नगरपरिषदेतील दहा प्रभागांपैकी ११ जागा महिलांसाठी तर १० जागा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पीठासीन अधिकारी तथा प्रांत अधिकारी (शिरूर) विठ्ठल जोशी आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
प्रभागानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे घोषित झाले आहे :
प्रभाग १: (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग २: (अ) अनुसूचित जाती (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ३: (अ) सर्वसाधारण (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ४: (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ५: (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ६: (अ) सर्वसाधारण (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ७: (अ) सर्वसाधारण (महिला), (ब) सर्वसाधारण
प्रभाग ८: (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ९: (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १०: (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), (क) सर्वसाधारण (महिला)
गावठाण फोडल्याने नाराजी
प्रभाग आरक्षणात गावठाण विभाग फोडल्याने अनुसूचित जाती समाजात नाराजी निर्माण झाली आहे. अनेक पारंपरिक राखीव प्रभाग बदलल्याने रंधवे, थोरात, पाटोळे, रणदिवे, भोसले, बनसोडे या समाजघटकांमध्ये असंतोष दिसून येतो आहे.
संदीप रंधवे यांनी सांगितले की, “गावठाण विभागातील बदलामुळे अनुसूचित जाती समाजावर अन्याय झाला असून आम्ही याविरोधात हरकती नोंदवणार आहोत.”
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्पष्ट केले की, लोकसंख्या, जातीय घनता आणि भौगोलिक रचनेचा विचार करूनच प्रभागांचे आरक्षण ठरविण्यात आले आहे.
या आरक्षणांवर १४ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पद खुलं – इच्छुकांची भाऊगर्दी
नगराध्यक्ष पद खुले जाहीर झाल्याने आळंदीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना (उभय गट) आणि अपक्ष उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर दावेदारी केली जात आहे.
माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, राहुल चिताळकर पाटील, प्रशांत कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, अजय तापकीर, सुरेश दौडकर, रोहिदास तापकीर, किरण येळवंडे, संजय घुंडरे पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.
तसेच माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे पाटील आणि माजी उपाध्यक्ष वासुदेव घुंडरे पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
महिला राजसत्ता आणि बहुरंगी लढत
या निवडणुकीत महिलांसाठी जास्त जागा राखीव झाल्याने ‘महिला राज’ प्रस्थापित होण्याची चिन्हे आहेत.
एकाच वेळी अनेक पक्ष आणि गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने बहुरंगी सामना रंगणार आहे.
आळंदीच्या विकासाचा धुरा कोण पेलणार आणि मतदार कोणावर विश्वास दाखवणार हे आगामी निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होणार

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























