पुणे|प्रतिनिधी (रोहिदास कदम)
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आटपाडीच्या तहसीलदार शीतल बंडगर यांनी रविवारी पहाटे स्वतः घटनास्थळी जाऊन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा तब्बल दीड तास पाठलाग करत हा प्रकार उघडकीस आणला.
माहितीनुसार, मान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर तहसीलदार शीतल बंडगर यांनी पथकासह कारवाई करत संशयित वाहनांचा पाठलाग केला. कारवाईदरम्यान काही वाहनचालकांनी वाहनांचा वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण करून कारवाई रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
मात्र तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवैध वाळू वाहतुकीचा डाव उधळून लावण्यात आला. या प्रकरणात संबंधित वाहनांची चौकशी सुरू असून अवैध वाळू उपसा व वाहतुकीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून महसूल प्रशासनाच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
– मानव मित्र न्यूज

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























