पुणे आळंदी (मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहिदास कदम)
आळंदी, दि. 18 जून 2026 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2026 च्या अनुषंगाने गुरुवार, दि. 18 जून रोजी सकाळी 11 वाजता आळंदी नगरपरिषद कार्यालयात माननीय उपविभाग अधिकारी (खेड) यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी व नियोजन बैठक पार पडली. बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पालखी सोहळ्याशी संबंधित मानकरी, नगरपरिषद पदाधिकारी व संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यंदाचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 8 जुलै 2026 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत म्हणजेच एकूण 33 दिवसांचा होणार आहे. 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता आळंदीतून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, 4 जुलै ते 8 जुलै या कालावधीत लाखो वारकरी आळंदीत दाखल होणार असल्याने प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.
वारकऱ्यांच्या दर्शन व निवासासाठी शासनामार्फत दर्शन मंडप उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
यंदा आखाती देशांतील युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यासोबत सहभागी होणाऱ्या 550 ते 600 दिंड्यांतील सुमारे 6 ते 7 लाख वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. दिंडीचे अधिकृत पत्र दाखविल्यानंतर तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
पालखी प्रस्थानावेळी रथासमोरील दिंडी क्रमांक 1 ते 27 तसेच रथामागील दिंडी क्रमांक 10 ते 20 मधील प्रत्येकी 90 वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच दिंडी प्रमुख, मानकरी व सेवेकऱ्यांना प्रसादासाठी हरी हरीशचंद्र स्वामी महाराज मठाच्या जिन्यामार्गे मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
महिला वारकऱ्यांच्या सुविधांवर यंदा विशेष भर देण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र पिंक टॉयलेट्स, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कॅबिन, तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मोबाईल टॉयलेट्स आणि स्वच्छतागृहे उभारण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. इंद्रायणी नदी परिसर, दिंडी मुक्काम स्थळे आणि प्रमुख मार्गांवर या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, वारकरी महिलांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
बैठकीत पालखी सोहळ्यासाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. महाद्वार परिसरात स्थानिक पोलिसांची अतिरिक्त नियुक्ती करण्याबाबतही चर्चा झाली. 9 जुलै 2026 रोजी सकाळी पालखीचे पुण्याकडे प्रस्थान होणार असून त्या वेळीही आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
इंद्रायणी नदी परिसर, दर्शन रांगा, मंदिर परिसर तसेच दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच वारी काळात आळंदी शहरातील सर्व सुलभ शौचालये वारकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान उर्वरित रस्त्यांची कामे, इंद्रायणी नदीपात्रातील अतिक्रमण हटविणे, वीजपुरवठा अखंडित ठेवणे, स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि इतर मूलभूत सुविधांबाबतही सविस्तर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते डी. जे. भोसले यांनी वारी काळात कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही देण्यात आली. तसेच प्रांत अधिकारी शुभांगी यांनी सर्व विभागांना उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत 2 जुलै 2026 रोजी पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यंदाचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध, स्वच्छ आणि वारकरी-केंद्रित वातावरणात पार पडावा, यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम




















