मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मठ परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. “श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त”, “हरिओम तत्सत”, “श्री गुरुदेव दत्त” या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
उत्सवाची सुरुवात स्वयंभू मातृलिंगाच्या पवित्र अभिषेकाने झाली. त्यानंतर लघुरुद्राभिषेक, दत्तयाग, सामूहिक महाआरती, गुरुपूजन, प्रवचन आणि नैवेद्य अशा विविध धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पडले. प्रत्येक विधीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमात धानोरे येथील सरस्वती माता महिला भजन मंडळाने सादर केलेल्या सुरेल भजनांनी उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मठ परिसरात चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो दत्तभक्तांनी गुरूंचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. दर्शनानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि दत्तनामाच्या जयघोषात पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली.
महाप्रसादासाठी शोभा चंद भगवान बलगट (बोटा, ता. संगमनेर), अरुणा गाडे (बारामती) तसेच श्री. अक्षय हरपळे (फुरसुंगी) यांनी अन्नदानासाठी उदार सहकार्य केले. भाविकांसाठी स्वादिष्ट व शिस्तबद्ध भोजन व्यवस्थेची जबाबदारी लोखंडे पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी बाजीराव नाना लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करत गुरूसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. गोरक्ष महाराज वर्पे यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सेवेकरी, देणगीदार, ग्रामस्थ आणि उपस्थित भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले. हरिनाम कीर्तनाने गुरुपौर्णिमा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव धार्मिक परंपरा, सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचा सुंदर संगम ठरला. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे श्री क्षेत्र मरकळ येथील दत्तभक्त ताई माऊली मठ पुन्हा एकदा भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे केंद्र बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























