पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे वकील वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहेतक्रारीनुसार, अॅड. साहिल शेख हे मित्रासह दुचाकीवरून जात असताना लोणीकंद पोलीस ठाण्यासमोरील वाहतूक कोंडीत त्यांच्या मित्राला कोणतेही कारण नसताना पोलीस शिपायाने मारहाण केली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या अॅड. शेख यांनाही कथितरित्या मारहाण करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यात नेऊनही मारहाण सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे
घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचा दावा करत संबंधित फुटेज जप्त करून पुरावे सुरक्षित ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर पोलीस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, तक्रारीतील आरोपांची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























