(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार (
पुणे जिल्ह्यातील सासवड ते पुणे या प्रमुख मार्गावरील दिवेघाट येथे सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कामांदरम्यान दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जात असल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत.
भर उन्हामध्ये दोन-दोन तास वाहनांच्या रांगा लागून नागरिक अडकून पडत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिक व प्रवाशांनी शासन आणि संबंधित प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच घाट बंद असलेल्या वेळेत पाणी व प्राथमिक सुविधांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
“उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना अडकवून ठेवणे हे अमानवी आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी भावना प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























