आळंदी : (संपादक रोहिदास कदम)आषाढी पायी वारीच्या पावन सोहळ्यानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वैभवी पालखी सोहळ्याचे आळंदी-पुणे मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथा-परंपरांचे पालन करत हरिनामाच्या अखंड गजरात माऊलींच्या पादुकांचे आगमन झाले.
यावेळी माऊलींच्या पादुकांची दही, दूध आणि मधाने महापूजा करण्यात आली. आरती, पुरणपोळीचा महानैवेद्य आणि पेढ्यांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर व सुनीता तापकीर यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा पार पडली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या श्रींच्या वैभवी चलपादुकांनी थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेतला. परंपरेनुसार हरिनामाच्या गजरात महापूजा करण्यात आली. हार, तुळशीहार आणि श्रीफळ अर्पण करून नामघोषात आरती करण्यात आली. मंदिर परिसरात फुलांच्या पायघड्या आणि आकर्षक रांगोळीमुळे संपूर्ण वातावरण अधिकच प्रसन्न आणि भक्तिमय झाले.
या प्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोढे, कबीरबुवा, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब रंधवे चोपदार, माजी सभापती अरुण चौधरी आदी मान्यवरांचा ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, उपरणे आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
रवींद्र गायकवाड, शांताराम तापकीर, राजेंद्र नाणेकर, चंद्रकांत मोरे, साहेबराव काशीद, विठ्ठल पांचाळ (पुजारी) तसेच अनेक मान्यवर आणि भाविक यावेळी उपस्थित होते.
सोहळ्यासाठी पोलीस उपायुक्त (DCP) मारुती जगताप आणि दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरातील आकर्षक रांगोळी सौ. रोहिणी परतगुळे यांनी साकारली असून ती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























