पुरंदर : प्रतिनिधी अशोक कुंभार/
मौजे आंबोडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील इनाम वर्ग ६-ब, महार वतन वर्ग २ या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतजमिनीमधून रस्ता मंजूर करून पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिलेला आदेश अन्यायकारक असून तो प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंबोडी गावचे मूळ रहिवासी नसलेले उद्योजक अन्वर शेख यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये रस्ता मागणी अर्ज दाखल केला होता. मात्र, सदर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसताना, तसेच स्थळ पाहणी व पीडित शेतकऱ्यांना नोटीस न देता, सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे यांच्या अहवालावर आधारित तहसीलदारांनी रस्ता मंजूर केला. हा आदेश अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप आहे.
सदर रस्ता गट नं. १३१ ते १४८ मधून मंजूर करण्यात आला असून, गट नं. १३१ हा आरक्षित वन क्षेत्र असल्याने ग्रामपंचायत व संबंधित वन अधिकाऱ्यांची परवानगी व जबाब न घेता आदेश देणे कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले.
या अन्यायाविरोधात पीडित महारवतन धारक शेतकरी सोमवार दि. १९/०१/२०२६ पासून उपविभागीय अधिकारी (प्रांत) पुरंदर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करीत आहेत.
तहसीलदार विक्रम राजपूत व मंडल अधिकारी सुहास कांबळे यांनी संगनमताने पदाचा दुरुपयोग करून आर्थिक तडजोडीतून हा निर्णय घेतल्याचा आरोप असून, त्यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करावा व संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर बेमुदत जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























