आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन महाराज साखरे यांच्या आशीर्वादाने अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण अधिक महिनाभर विविध धार्मिक, आध्यात्मिक व ज्ञानप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवात श्री संत ज्ञानेश्वर महाराज सामुग्री ग्रंथ पारायण, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण, श्री चांगदेव पासष्टी, अमृतानुभव तसेच श्री ज्ञानेश्वरीवरील प्रवचनांची मालिका आयोजित करण्यात आली. हरिनाम महोत्सव व ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक ज्ञानाची मेजवानी मिळाली.
या महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत केरूबा गंजेवार होते. विश्वस्त श्री राजू रामदास चिद्रवार पवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दत्तात्रय महाराज, मार्गदर्शक विश्वस्त ह.भ.प. विष्णुपंत रामकृष्ण चिद्रवार (सावकार बाबा) तसेच व्यवस्थापक श्री राजेश्वर पांपटवार यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
गुरुवर्य श्री किसन महाराज साखरे यांचे चिरंजीव ह.भ.प. ॲड. श्री चिद्बरेश्वर किसन महाराज साखरे यांनी ‘श्री चांगदेव पासष्टी’ या विषयावर सकाळी ८ ते १० या वेळेत प्रभावी प्रवचन सेवा दिली. तसेच ह.भ.प. डॉ. सी. नारायण महाराज जाधव यांनी ‘अमृतानुभव’ ग्रंथाच्या नवव्या प्रकरणावर सखोल निरूपण करून भाविकांना ज्ञानाचा अमृतसिंचन अनुभव दिला.
कार्यक्रमात गायक, वादक, श्री गुरु साखरे महाराज संस्थान साधकाश्रमातील विद्यार्थी, श्री कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तसेच ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव यांचे शिष्य सहभागी झाले. यामध्ये ह.भ.प. निळोबा महाराज (आळंदी देवाची), ह.भ.प. विनायक महाराज निघोट, ह.भ.प. सुरेश महाराज साळुंखे, ह.भ.प. संपत महाराज सुरासे आदींचा विशेष सहभाग लाभला.
हरिनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणात हा अधिक मास महोत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक भावनेने साजरा करण्यात आला.
🔸 अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी
🔸 ज्ञानेश्वरी, गाथा पारायण, अमृतानुभव आणि हरिनाम गजराने अधिक मास महोत्सव भक्तिमय वातावरणात

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























