,(आळंदी वार्ताहार सचिन शिंदे )
आळंदी : महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आळंदी शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. आळंदी नगर परिषद येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. समाजात शिक्षणाचा प्रसार करून समतेचा विचार रुजवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 📚
दरम्यान आळंदी शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त पालकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासोबतच तळागाळातील युवक व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देण्यात आली.
सध्या शिक्षणाचा मोठा बाजार निर्माण झाला असून मोठ्या खर्चानंतरही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देताना पुढील बाबींची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले :
शाळेला शासनाची मान्यता आहे का
शिक्षक पदवीधर व प्रशिक्षित आहेत का
शाळेत खेळाचे मैदान आहे का
आकारण्यात येणाऱ्या फीच्या मोबदल्यात सुविधा मिळतात का
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते का
गरीब पालक देखील मुलांनी इंग्लिश मीडियममध्ये शिकावे, असे स्वप्न पाहतात. मात्र काही खाजगी शाळांकडून जाहिरातींच्या माध्यमातून पालकांची दिशाभूल केली जात असल्याचे नमूद करण्यात आले. गणवेश, देणगी व विविध शुल्काच्या नावाखाली पालकांचे आर्थिक शोषण होत असल्याचीही बाब समोर आली.
महात्मा फुले जयंतीनिमित्त पालकांनी सजग राहून योग्य शिक्षण न मिळाल्यास संबंधित शाळांना जाब विचारावा, आवश्यक असल्यास तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले. अशा तक्रारींसाठी आळंदी शहर काँग्रेस कमिटी पालकांच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले.
शाळांनी देखील विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या फीच्या मोबदल्यात योग्य सुविधा व दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
टिप : आळंदी नगरपालिका व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण सर्वार्थाने सोयीचे असल्याचेही नमूद करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आळंदीत शिक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















