पुणे वार्ताहार (अँड जगदीश सोनवणे)आंबेठाण चौकात प्राध्यापकावर हल्ला; सरपंचांच्या गाडीचा उल्लेख, पोलिसांवर विलंबाचा आरोप
चाकण परिसरातील आंबेठाण चौक येथे भरदिवसा झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक येथील प्राध्यापक प्रसाद सुधाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी व मुलीसह पुण्यावरून नाशिककडे जात असताना काही व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून मारहाण केली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून वापरण्यात आलेली गाडी ही आंबेठाण गावचे सरपंच संतोष मांडेकर यांच्या नावाशी संबंधित असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादीला नाक व तोंडावर गंभीर मार लागला असून वाहनाचेही नुकसान करण्यात आल्याचा आरोप आहे. पत्नी व मुलीलाही शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१२/२०२६ अंतर्गत BNS कलम 118(1), 115(2), 352, 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पीडित कुटुंबाने पोलिसांवर तक्रार घेण्यास विलंब केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “मारहाण करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक असूनही तत्काळ कारवाई झाली नाही,” असा संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे चाकण परिसरात चर्चांना उधाण आले असून, नागरिकांकडून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























