पशुपालकांचे मोठे नुकसान; दोषींवर कारवाईची मागणी
पुरंदर तालुक्यातील काळदरी खोरे व पुरंदर किल्ला परिसरातील डोंगर भागात रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी अवैधरीत्या बॉम्ब (स्फोटके) लावण्यात येत असल्याचे प्रकार वाढले आहेत. हे बॉम्ब पाळीव जनावरांच्या खाद्यात मिसळले जाऊन गायी, म्हशी यांसारख्या पशुधनाला तोंडात फुटत असून त्यातून भीषण जखमा व प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत.
नुकत्याच घडलेल्या घटनेत नारायणपूर येथील लेपवाले आप्पा बोरकर यांच्या गायीच्या तोंडात बॉम्ब फुटून अत्यंत गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. यापूर्वी कळत डांगे यांच्या म्हशीचेही अशाच प्रकारे मोठे नुकसान झाले होते. या जखमा इतक्या गंभीर असतात की त्यावर कोणत्याही प्रकारची प्रभावी ट्रीटमेंट करणे शक्य होत नाही, असे पशुवैद्यकांकडून सांगण्यात येत आहे.
या घटनांमुळे पशुपालकांचे आर्थिक तसेच मानसिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेष बाब म्हणजे बॉम्ब तोंडात फुटून झालेल्या नुकसानासाठी शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही, ही बाब पशुपालकांसाठी अधिक चिंताजनक आहे.
रानडुकरांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे वास्तव असले, तरी त्यावर मानवी व कायदेशीर मार्गाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशा स्फोटकांचा वापर करून पशुधनाचा बळी घेणे पूर्णतः चुकीचे व गुन्हेगारी स्वरूपाचे आहे.
या प्रकरणी सर्व पशुपालकांनी जागरूक राहावे व अशा संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ संबंधितांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासन व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असून, बॉम्ब ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























