तुळजापूर प्रतिनिधी :
तुळजापूर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. पंडितराव देविचंद जगदाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या नगरसेवक पदाचे सर्व मीटिंग भत्ते (मानधन) नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३, तुळजापूर (खुर्द) यांना देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे.
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. ३ ही शाळा शैक्षणिक गुणवत्तेसाठी विशेष ओळख निर्माण करणारी आहे. सन २००८-०९ आणि २००९-१० या शैक्षणिक वर्षांत लातूर विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण ठरण्याचा मान या शाळेला मिळाला आहे. तसेच सन २०१७ मध्ये मराठवाड्यातील ISO मानांकन प्राप्त करणारी पहिली नगरपालिकेची शाळा आणि सौरऊर्जेवर चालणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा म्हणूनही तिची नोंद आहे.
सद्यस्थितीत या शाळेत ४४७ विद्यार्थी शिक्षण घेत असून १४ शिक्षक अध्यापनाचे कार्य करत आहेत. शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सातत्याने योगदान देण्याच्या भूमिकेतून नगरसेवक पंडितराव जगदाळे यांनी यापूर्वीही सन २००१ पासून नगरसेवक पदाचे तसेच सन २०१७ मधील प्रभारी नगराध्यक्ष पदाचे मानधन शाळेला दिले आहे.
सन २०२५ च्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतरही त्यांनी हा सामाजिक उपक्रम कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे शिक्षणप्रेमी नागरिक, पालक व विविध स्तरांतून मनःपूर्वक कौतुक होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























