(
पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार ) अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दाक्षिणात्य पुष्पसजावट आकर्षणाचे केंद्र
पुण्यातील मानाचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात नटले. यंदा मंदिरात ‘दाक्षिणात्य’ शैलीतील भव्य पुष्पसजावट करण्यात आली असून, ही आरास भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
मंदिराच्या पायथ्यापासून कळसापर्यंत विविधरंगी देशी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कळसावर फुलांच्या माध्यमातून विविध देवतांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या असून, ही कलाकृती भक्तांसाठी आकर्षण ठरली आहे. मंदिराच्या दर्शनी भागात गजराजाच्या प्रतिमाही फुलांमधून उभारण्यात आल्या आहेत.
अंगारकीच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला, तर सकाळ आणि दुपारच्या सत्रात गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण दिवस मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, यंदा सजावटीसाठी देशी फुलांना प्राधान्य देण्यात आले असून झेंडू आणि शेवंती या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
अंगारकी निमित्त साकारलेली ही आकर्षक आणि पारंपरिक पुष्पआरास पुणेकरांसाठी आणि भाविकांसाठी भक्तीचा आणि सौंदर्याचा दुहेरी अनुभव ठरली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























