पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) : पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील मंडळ अधिकारी (महसूल) यांच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवरी येथील रहिवासी देवानंद गोपाळ लिंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीत मंडळ अधिकाऱ्यांवर शासकीय नियमांचे उल्लंघन, खासगी कार्यालयातून कारभार चालविणे, प्रकरणे प्रलंबित ठेवणे तसेच नागरिकांची गैरसोय केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार संबंधित मंडळ अधिकाऱ्यांचे शासकीय कार्यालय शिवरी येथे असताना ते सासवड येथील खासगी कार्यालयातून कामकाज करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय नागरिकांना शासकीय कार्यालयाऐवजी खासगी कार्यालयात बोलावले जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की, मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीतील विविध तलाठी कार्यालयांमध्ये खासगी व्यक्तींमार्फत कामे करून घेतली जात असून हे शासनाच्या नियमांच्या विरोधात आहे. फेरफार नोंदी व इतर महसुली प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून अनेक अर्ज व प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारीत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम तसेच शासनाच्या विविध परिपत्रकांचा उल्लेख करण्यात आला असून, अनेक फाईली आणि अर्ज सहा-सहा महिने प्रलंबित राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयांकडून आलेले चौकशी अहवाल आणि पंचनामे देखील वेळेत निकाली काढले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.
(सूचना : सदर आरोप तक्रार अर्जामध्ये करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.)

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























