कुदळवाडी-चिखलीतील अतिक्रमण कारवाईला विरोध; ३३ जणांना अटक
पिंपरी-चिंचवड | मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. कारवाईला विरोध करत काही व्यक्तींनी दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी ३३ जणांना अटक केली असून तीन अल्पवयीनांचाही सहभाग समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे महापालिकेचे पथक पोलिस बंदोबस्तात अनधिकृत मंदिर, मशीद आणि इतर धार्मिक बांधकामांवर कारवाई करत होते. त्यावेळी काही व्यक्तींनी मोठा जमाव गोळा करून प्रशासनाच्या कारवाईला विरोध केला. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलिस निरीक्षक राम गोमारे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. तसेच शासकीय वाहनांसह इतर वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपी नाजीम नईम चौधरी आणि इजाज वकार चौधरी यांच्यासह एकूण ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दंगल घडवून आणणे आदी गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
चिखली पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर कुदळवाडी-चिखली परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामे आणि धार्मिक स्थळांवरील प्रशासनाच्या धोरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























