आळंदी | रोहिदास कदम: धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प. दिलीप महाराज शामराव ठाकरे यांना आदर्श राष्ट्र गौरव सन्मान सोहळा-२०२६ मध्ये राज्यस्तरीय आदर्श कीर्तनरत्न महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानार्थ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांनी कीर्तन, प्रवचन आणि अध्यात्मिक जनजागृतीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले असून त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आयोजक संस्थेकडून त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक व राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे, ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे हे शास्त्रयुक्त पद्धतीने नर्मदा परिक्रमा घडविण्याचे कार्यही अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहेत. भाविकांना नर्मदा परिक्रमेचे धार्मिक महत्त्व, नियम, परंपरा आणि आध्यात्मिक साधनेचे मार्गदर्शन करून शेकडो भाविकांना नर्मदा परिक्रमा घडविण्यात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. 
या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी ह.भ.प. दिलीप महाराज ठाकरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























