- पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर अहिरे पाईट हद्दीतील ठाकरवस्ती येथे लागलेल्या भीषण आगीत पाच आदिवासी कुटुंबांची घरे जळून खाक झाली असून १७ ते १८ सदस्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या आगीत खालील कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे:
सोपान बबन केदारी
भोराबाई कृष्णा केदारी
ज्ञानेश्वर बबन केदारी
कृष्णा पांडू केदारी
गीताबाई सावळेराम जाधव
आगीत घरांसह संपूर्ण संसार जळून खाक झाला. घरातील भांडी, धान्य, कपडे, लहान मुलांचे शालेय साहित्य, तसेच शेळ्या व पाळीव प्राण्यांचाही नाश झाला आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड तालुक्यातील आमदार बाबाजीशेठ काळे यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. अनुराग जैद यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले व तात्काळ ११,००० रुपयांची रोख मदत सुपूर्त केली. तसेच तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. सारिकाताई अर्जुन गोगावले यांनी प्रत्येक कुटुंबाला ५,००० रुपये प्रमाणे एकूण २५,००० रुपयांची मदत दिली.
या प्रसंगी महेश शेटे, शशिकांत आहेरकर, उद्योजक अर्जुन गोगावले, ग्रामसेवक जंगले भाऊसाहेब यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🤝 मदतीचे आवाहन
या भीषण आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून मदतीची गरज आहे. जे शक्य असेल ती मदत या कुटुंबांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन ॲड. अनुराग जैद यांनी केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























