पुरंदर (प्रतिनिधी अशोक कुंभार,)
सासवडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड-कोडीत रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यावरील खोल खड्डे, गायब झालेले साईट पट्टे आणि निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभाग यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे.
दररोज सासवड, गराडे, थापेवाडी, दरेवाडी, वारवडी, कासुर्डी आणि खेड शिवापूर या गावांतील शेकडो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. समोरून मोठी वाहने आली की दुचाकीस्वारांना संतुलन राखण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे लहानमोठे अपघात घडत आहेत.
भाविकांचा त्रास:
कोडीत गावातील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिरात पौर्णिमा, अमावास्या आणि रविवारच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पण रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेमुळे या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राजकीय दुर्लक्ष:
कोडीत गाव हे माजी मंत्री व आमदार विजय शिवतारे यांचे मताधिक्याचं क्षेत्र असूनही, या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका समीप आल्या असताना जनसेवेच्या नावाखाली उमेदवार तयारीत आहेत, पण खऱ्या अर्थाने जनतेच्या मूलभूत समस्यांकडे — म्हणजे रस्त्यांकडे — लक्ष नाही.
हायकोर्टाचा निर्णय आणि जबाबदारीचा प्रश्न:
हायकोर्टाच्या अलीकडील निर्णयानुसार, खड्डेमुळे अपघात झाल्यास संबंधित प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला भरपाई देण्याची जबाबदारी असणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की रस्त्यांची योग्य देखभाल न करणे ही निष्काळजीपणाची कृती असून त्यातून नागरिकांना हानी पोहोचल्यास शासन जबाबदार धरले जाईल.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सासवड-कोडीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी थेट सार्वजनिक बांधकाम विभागावर येते. तरीही अधिकारी “निद्रावस्थेत” आहेत, हे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांचा सवाल:
“निवडणुकीत वायदे होतात पण रस्ते मात्र खड्ड्यांनी गच्च. आता न्यायालयीन निर्णय असूनही प्रशासन झोपेत का? खड्ड्यात पडून जीव गमावल्यावरच हालचाल होणार का?” — स्थानिक नागरिक
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून, दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
👉 खड्ड्यांचं साम्राज्य वाढतंय, पण जबाबदार मात्र झोपेत!
सासवड-कोडीत रस्ता — नेमका रस्ता आहे की खड्ड्यांचा सापळा? हा प्रश्न नागरिकांना छळतोय.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























