(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांना याबाबतचे मेसेजही प्राप्त होऊ लागले आहेत.
माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केला. त्यानंतर विभागाने लाभार्थींना हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारी रात्रीपासून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याची माहिती समोर आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाल्याने लाभार्थींमध्ये समाधानाचे वातावरण असून उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारकडून लाभार्थींना आवाहन करण्यात आले आहे की, बँक खात्याशी आधार लिंक व केवायसी पूर्ण असल्याची खात्री करावी, जेणेकरून हप्ता वेळेवर मिळू शकेल.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























