🔴 नुकसानभरपाईसाठी वन विभाग व शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी
पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) | प्रतिनिधीअशोक.कुंभार
पुरंदर तालुक्यातील पांगारे हे गाव डोंगरी व अत्यंत दुर्गम भागात असून महाराष्ट्र शासनाच्या दुर्गम गावांच्या यादीत समाविष्ट आहे. या गावामध्ये रानडुकरांनी शेतपिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ला करत उसाच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
पांगारे येथील शेतकरी श्री. बाळासो कृष्णराव काकडे उर्फ रामराजे काकडे, रा. पोस्ट पांगारे, यांचे गट नंबर ६५६, ६४ व ६५ मधील सुमारे ३ एकर २० गुंठे क्षेत्रातील ऊस पिकावर रानडुकरांनी ७० ते ८० टक्के नुकसान केले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
या भागात शेतामध्ये काम करणाऱ्या महिला मजूरसुद्धा भीतीपोटी शेतात थांबू शकत नाहीत. एक-दोन मजूर असले तरी रानडुकरांच्या धास्तीने काम करणे अशक्य झाले आहे. यामुळे शेतीची पुढील कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
या घटनेबाबत शेतकरी काकडे कुटुंबीयांनी वन विभागीय अधिकारी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांच्याकडे निवेदन सादर केले असून तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात वन विभागासह महसूल विभागानेही तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे शेतकरी काकडे यांची लहान मुलगी कुमारी ओवी नंदकुमार काकडे हिने देखील या नुकसानाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवत प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.
पांगारे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये अशाच प्रकारे रानडुकरांनी नुकसान केले असून संपूर्ण गावातील शेतकरी एकत्र येत शासन व वन विभागाने त्वरित उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करत आहेत.
या मागणीला
बाळासो कृष्णराव काकडे,
संतोष रामचंद्र काकडे,
हनुमंत दशरथ काकडे,
शहाजी बबन काकडे
यांच्यासह सर्व पांगारे ग्रामस्थांचा पाठिंबा आहे.
➡️ रानडुकरांच्या हल्ल्याला जबाबदार कोण? वन विभाग की महाराष्ट्र शासन?
➡️ नुकसानभरपाई मिळणार का?
याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























