श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या चार वर्षांपासून पुणे महानगरपालिकेची बस सेवा सुरू असतानाही जेजुरी येथे प्रवाशांसाठी अद्याप सुसज्ज बसस्थानक किंवा साधा प्रवासी निवारा उभारण्यात आलेला नाही.
उन्हाळ्यात कडक ऊन, पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमध्ये प्रवाशांना उघड्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. हजारो भाविक आणि नागरिकांना दररोज या गैरसोयीचा सामना करावा लागत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बसथांबा नसल्यामुळे खासगी वाहन चालकांचा मनमानी कारभार वाढला आहे. काही ठिकाणी प्रवाशांकडून जादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अधिकृत थांबा नसल्याने प्रवाशांना सुरक्षितपणे उभे राहण्यासाठी जागाही उपलब्ध नाही. महिलां, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
“जेजुरीसारख्या जागतिक कीर्तीच्या धार्मिक स्थळी लाखो भाविक येतात, मात्र साधा पत्र्याचा शेड किंवा प्रवासी निवारा देखील नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केली.
स्थानिकांनी पुणे महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाकडे तातडीने सुसज्ज बसस्थानक, प्रवासी निवारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बस वेळापत्रक फलक आणि सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























