सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) :
पुरंदर तालुक्यातील जनतेच्या विविध प्रलंबित जनहिताच्या मागण्यांसाठी पूरोगामी संघर्ष परिषद या सामाजिक संघटनेतर्फे उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सासवड येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ पासून शांततेच्या मार्गाने सुरू झाले असून, याचे नेतृत्व माननीय मनोज दादा भिसे, राज्य अध्यक्ष युवक पूरोगामी संघर्ष परिषद करत आहेत.
या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी संघर्षप्रमुख सुभाष वायदंडे हे आंदोलन स्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुरोगामी संघर्ष परिषदेने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत :
प्रांत अधिकारी व तहसीलदार न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचे निकाल तातडीने जाहीर करावेत, तसेच राखून ठेवलेल्या निकालांबाबत खातेवार चौकशी करण्यात यावी.
अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांचे एसटी/सीएसटी दाखले तत्काळ देण्यात यावेत, तसेच मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पंचनाम्याची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी.
सेतू केंद्राबाहेर सुरू असलेली खाजगी कार्यालये तातडीने बंद करण्यात यावीत, कारण या कार्यालयांमुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लहान शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी सरकारी यंत्रणेद्वारे तातडीने करण्यात यावी, तसेच लहान क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची मोजणी नाकारणे ही भूमिका तातडीने रद्द करण्यात यावी.
मोजणी खात्यात निकालासाठी घेतल्या जाणाऱ्या रकमेची पावती देणे बंधनकारक करण्यात यावी, आणि शेतकऱ्यांची लूट थांबवावी.
दुय्यम निबंधक कार्यालयातील बेकायदेशीर दस्त व्यवहारांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात यावी.
महावितरण कंपनीने बसवलेले नवीन विजेचे मीटर तातडीने थांबवावेत, कारण या मीटरमुळे गिऱ्हाईकांना दुहेरी विजेची बिले येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावेत, तसेच संबंधित पोलिसांवर चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी.
या सर्व मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पूरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. . . 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























