(आळंदी प्रतिनिधी रवी कदम) फोटो अँड व्हिडिओ माऊली संस्थान आळंदी यांच्या सौजन्य
“तीर्थक्षेत्र आळंदी येथे प्रबोधिनी एकादशी निमित्त आज माऊलींच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा भक्तीभावात पार पडली. अलंकापुरी नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली.
मंदिर परिसरासह पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
एकादशीच्या प्रथा परंपरा जोपासत, हरिनाम गजरात ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली.
हजेरी मारुती मंदिर मार्गे इंद्रायणी नदी किनाऱ्याने श्रींची पालखी मिरवण्यात आली.
भाविकांनी ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम!’च्या घोषात दर्शन घेतले.
प्रमुख मानकरी, सेवक, तसेच मंदिर व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांच्या हस्ते नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंदिरात दिवसभर श्रींची पूजा, आरती, फराळाचा नैवेद्य व धुपारतीचे आयोजन करण्यात आले.
इंद्रायणी आरती ग्रुप व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने घाट स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला.
संयोजक अर्जुन मेदनकर, अनिता झुजम, सुवर्णा काळे, संदीप रंधवे, उमेश बिडकर आदींच्या उपस्थितीत इंद्रायणी आरती हरिनाम गजरात संपन्न झाली.
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने ही आरती आणि स्वच्छता उपक्रम सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट संदेश देऊन गेला.
दरम्यान, पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेसाठी स्वकाम सेवा मंडळाचे २०० सेवक रवाना झाले आहेत.
मंदिर परिसर स्वच्छता आणि प्रसाद पॅकींग सेवेत हे सेवक सहभागी होणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
माऊलींच्या भक्तीत हरिनामाचा गजर, इंद्रायणीचा घाट आणि पंढरपूरची सेवा — या सर्वातून एकच संदेश उमटला —
‘सेवा हीच खरी भक्ती!’”

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























