बीड | प्रतिनिधी मेघा चाटे
शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत श्री साईबाबा संस्थानाला विविध माध्यमांतून तब्बल ७७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. ही माहिती संस्थानच्या अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवासाठी तीन लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. भक्तांनी रोख रक्कम, ऑनलाइन व्यवहार, धनादेश, तसेच सोने-चांदी आदी स्वरूपात उदंड देणग्या अर्पण केल्या. तीन दिवसांची संपूर्ण मोजदाद पूर्ण झाल्यानंतर संस्थानने ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली.
दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. यंदा प्राप्त झालेली देणगी ही अलीकडील काळातील विक्रमी मानली जात असून, संस्थानच्या विविध धार्मिक, सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांसाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे.
भक्तांच्या श्रद्धा आणि साईबाबांवरील अढळ विश्वासामुळे यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संस्मरणीय ठरला आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























