आळंदी | प्रतिनिधी माऊली घुंडरे
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आळंदीत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. गणेश मंदिर चौकात धार्मिक वातावरणात गणेश आरती, पसायदान आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन उपस्थितांना रामरक्षा स्तोत्राच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
आळंदीतील शिवतेज मित्र मंडळ, गणेश मंदिर चौक येथे आयोजित कार्यक्रमानंतर शिवसैनिकांनी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलकांनी श्रीराम मंदिरातील देणगी ही भाविकांच्या श्रद्धेची ठेव असून तिचा अपहार करणाऱ्यांना कोणतीही माफी मिळू नये, अशी भूमिका मांडली.
या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक विजयाताई शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर तीव्र टीका करत कथित गैरव्यवहारातील दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे यांनीही श्रीराम मंदिराच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात कठोर शब्दांत निषेध नोंदवत पारदर्शक चौकशीची मागणी केली.
कार्यक्रमानंतर श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त अर्जुनराव मेदनकर यांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिक व नागरिकांना रामरक्षा स्तोत्राच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. धार्मिक कार्यक्रम आणि निषेध आंदोलनाचा अनोखा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
या आंदोलनात खेड तालुका व आळंदी पंचक्रोशीतील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. किरण लोखंडे, हिरामण लोखंडे, दत्ता हारदे, रोहिदास जाधव, सार्थक गोडसे, सचिन गावडे, विजयाताई शिंदे, लक्ष्मणराव जाधव, सचिन राक्षे, मधुकरराव शिर्के, तानाजी गाढे, काळूराम थोरवे, अमोल पठारे, नंदाताई धायबर, विश्वास नेहरे, भानुदास येळंवडे, ज्योतीरादित्य लोखंडे, अनिताताई झुजम, शोभा कुलकर्णी, कल्याणी मालप, सविता कांबळे, शैला तापकीर, सरस्वती भागवत, सुरेखा काळभोर, आनंदराव मुंगसे पाटील, शशीकांत राजे जाधव, गणेश नेटके, मंगेश तिताडे, मनोज पवार, निखिल तापकीर, आशिष गोगावले, श्रीपाद सुर्वे, ओंकार इंगळे, जयहरी डिवरे, चारुदत्त रंधवे, संजय शेठ वडगावकर, विलास कुऱ्हाडे पाटील, उत्तमराव गोगावले, विजय राजने, हनुमंत थोरवे, सचिन तापकीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
(टीप : वरील वृत्त हे आयोजकांनी केलेल्या आरोप, मागण्या आणि आंदोलनातील वक्तव्यांवर आधारित आहे. कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत संबंधित यंत्रणांची अधिकृत चौकशी व निष्कर्ष येणे बाकी आहे.)

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























