पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार
कात्रज (पुणे), दि. १० जुलै २०२६ : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संगमेश्वर दिंडीचे कात्रज येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने भव्य स्वागत करण्यात आले. कै. दिनकरराव माऊली फाटे व कै. किसनराव (माऊली) यमाजी कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्वागत सोहळ्यात वारकरी, भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी संगमेश्वर दिंडीचे स्वागत फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामस्मरणाच्या जयघोषात करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. शेखर महाराज जांभुळकर यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. तसेच संगमेश्वर दिंडीचे चालक ह.भ.प. नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचा प्रवास भक्तिमय वातावरणात पुढे मार्गस्थ झाला.
कार्यक्रमानंतर वारकरी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विकासनाना फाटे, प्रशांत फाटे, चंद्रकांत फाटे, अतुल फाटे, शंकर निंबाळकर, विनितेश फाटे, संकेत फाटे, अथर्व फाटे, सारंग फाटे तसेच समस्त फाटे परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.
या प्रसंगी प्रकाश कदम, विलास मांगडे, महेश कदम, आप्पा लाटमे, महेश जाधव, योगेश खैरे, काशिनाथ आबा काशीद आणि कृष्णाजी शेलार हे मान्यवर उपस्थित होते.
संगमेश्वर दिंडीच्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण कात्रज परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला आणि वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























