सासवड, ता. पुरंदर प्रतिनिधी अशोक कुंभार ग्रामीण रुग्णालय सासवड येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला.
या मोहिमेसाठी सासवड परिसरात एकूण २२ बूथ केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. बूथ दिवशी डोस घेऊ न शकलेल्या बालकांसाठी दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत घरभेटीद्वारे लसीकरण करण्यात आले. यासाठी एकूण १८ पथके कार्यरत होती.
सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ४,९८४ बालकांची नोंद करण्यात आली होती. या सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये इन्चार्ज पद्मिनी धायगुडे, स्वाती कदम (स्टाफ नर्स), प्रगती नाळे (स्टाफ नर्स) तसेच कीर्ती गवते (स्टाफ नर्स) यांनी विशेष योगदान दिले. ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत मोहिम यशस्वी केली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमुळे बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळण्यास मदत होत असून, सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























