मानव मित्र न्यूज प्रतिनिधी (अशोक कुंभार)
फलटण शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे काही काळ शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, धमकी व मारहाणीप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२६ रोजी अनिकेत संतोष घाडगे (रा. दत्तनगर, फलटण) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीसंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरून अजिम हासन आतार (रा. शुक्रवार पेठ, फलटण) याने आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीने फोनवरून शिवीगाळ करत पोस्ट हटविण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तसेच, आरोपीने फिर्यादीच्या परिसरात जाऊन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2), 351(3), 351(4) आणि 131 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एनसीआर क्रमांक 0366/2026 नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीसांकडून सध्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























